वर
 

‘श्री’ची मिरवणूक व वाहन

पारोळे येथील भगवान श्री बालाजी महाराज यांच्या उत्सवाची माहिती -

श्री बालाजी महाराजांचा उत्सव मिती भाद्रपद वद्य १३ पासून सुरु होतो. भाद्रपद वद्य पक्ष हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. त्या पितृपक्षात कोणत्याही शुभ कार्याचे मुहूर्त नसून वरील दिवशी सूर्योदयाच्या वेळेस ब्रह्म मुहूर्त म्हणून उत्सवाच्या मंडपाच्या खांबांची मुहूर्त मेळ (पूजा) करण्यात येते. तसेच भाद्रपद वद्य आमावस्येस पंचांगात दाखविल्यास त्या दिवशी ‘श्री’ची मिरवणूकीस सुरुवात होते.

आश्विन शुद्ध प्रतिपदा वाहनास सुरुवात -

ध्वजाचे वाहन

चार चाकी गाडीवर (मोठी) सिंहासन ठेऊन त्या सिंहासनावर श्रींची स्थापना करण्यात येते. समोर आजूबाजूस गरुड व हनुमंत या दोन मित्रांचा समावेश असतो आणि श्रींच्या डोक्यावर छत्री लावलेली असते.

सदरच्या वाहनांवर रोषणाई केलेली असते. संध्याकाळी ६ वाजेस श्रींची मिरवणुकीस सुरुवात होते. श्रींच्या प्रत्येक वाहनापुढे पालखी असते. त्या पालखीत श्रींचीच पद्मावती लक्ष्मीसह मूर्ती विराजमान होतात.

मिरवणुकीच्या पुढे वाद्ये, बँड, गुरव, डफवाले, लेझीम, तुतारी, भेरवाले वगैरे सर्व प्रकरच्या वाद्यांचा समावेश असतो. वरील वाहनास दोर लावून माणसाकडून ओढून नेतात. वाहनांच्या पुढे चोपदार असतात. अशा या मोठ्या थाटात श्रींची मिरवणुक सुरु होते. सर्व भाविक लोक आपल्या दाराशी श्रींचे वाहन आल्यावर आरती दाखवतात.

श्रींची आरती राममंदिराकडूनच व्हावयास पाहिजे. याचे वैशिष्ठ म्हणजे पुराणातील आधार - श्री रामचंद्र प्रभु हे लक्ष्मणाचे वडील भाऊ म्हणून यांची भेट होत असते. अर्थात बालाजी अवतार म्हणजेच लक्ष्मण अवतार समजला जातो. म्हणूनच बंधूभेट करण्यात येते.

नागाचे वाहन - (कालीया मर्दन)

आश्विन शु. २ चारचाकी गाडीवर नागाची वेटोळे घेतलेली व मोठ्या फणाधारी (पाच फणांची) असलेली मूर्ती ठेवण्यात येते. सदर मूर्ती धरण्यास २-३ हमाल लोक लागतात. या फणावर श्रींची स्थापना करण्यात येते. त्याच्या आजूबाजूस २ नागकन्या असतात. पुढे गरुड-हनुमंत हे हात जोडून उभे असतात.

आश्विन शु. २ वाहन मंदिरात आल्यावर रात्री १० वाजेस चित्रा नक्षत्र पाहून गरुड ध्वज पूजा करतात.

आश्विन शु. ३ [१] मोराचे वाहन

नेहमीप्रमाणे त्या गाडीवर मोराचा पिसारा फुललेली (चंद्राकृती आकाराची) मोठी मूर्ती बसविण्यात येते. त्या मूर्तींवर श्रींची स्थापना व समोरच गरुड, हनुमंत राहिलेले वाहन ज्या वेळेस सुरु होते, त्यावेळेस मोर थुई थुई नाचत आहे असे दिसते.

टीप : सदरचे वाहन दोन तृतीया किंवा मिती वाढ झाल्यास निघते.

आश्विन शु. ३ चंद्राचे वाहन

नेहमीप्रमाणेच त्या चार चाकी गाडीवर हरणाची गाडी ठेवून त्यावर चंद्राची मूर्ती बसवितात. (सारथी) व त्यावर श्रींची स्थापना करण्यात येते व समोरच गरुड-हनुमान हात जोडून उभे राहिलेले.

आश्विन शु. ४ घोड्याचे वाहन

नेहमीप्रमाणेच त्या चार चाकी गाडीवर घोड्यास बसवून त्यावर श्रींची स्थापना करण्यात येते व समोरच गरुड-हनुमान हात जोडून उभे राहिलेले.

आश्विन शु. ५ वाघाचे वाहन

नेहमीप्रमाणेच त्या चार चाकी गाडीवर वाघाची मूर्ती बसवून त्यावर श्रींची स्थापना करण्यात येते व समोरच गरुड-हनुमान हात जोडून उभे राहिलेले.

आश्विन शु. ६ कल्पवृक्षचे वाहन

सदरच्या वाहनावर कल्पवृक्षचे झाड फार सुशोभित कारागिरीने केलेले आहे. झाडावर पोपट, वानर, साळुंखी वगैरे बसलेले आहेत. कल्पवृक्षाच्या छायेखाली श्रींची स्थापना करण्यात येते. ज्याप्रमाणे गोवर्धन पर्वताच्या खाली भगवान पेंद्या, गाई, गोपी, सवंगड्यासह असतात त्याचप्रमाणे कल्पवृक्षाच्या खाली भगवान पेंद्या, गाई, गोपी, सवंगड्यासह आहेत.

आश्विन शु. ७ श्री मालक गिरी शेठ यांच्या भेटीस देव जातात.

सकाळी आठ वाजता श्रींची मूर्ती पालखीत विराजमान करुन सदरची पालखी मालकाच्या (गिरी शेठ) भेटीसाठी छ्त्रीजवळ (सोनापूर - विद्यमान अमरधाम) मालकांच्या पादुकेची पूजा अभिषेक होतो.

आश्विन शु. ७ हत्तीचे वाहन

सदरच्या वाहनावर श्रींची स्थापना करण्यात येते. संतमेळा- श्रींच्या उजव्या बाजूस मालक श्री गिरी शेठ यांची मूर्ती त्यांच्या खांद्यावर श्रींची मुर्ती असलेली पडसी. त्या पडसीत श्रींची मुर्ती सुशोभित दिसत. यावरुन मालकसोबत श्रींची मूर्ती पडसीत आल्याचा इतिहास प्रसिद्ध आहे. डाव्या बाजूस श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत नरसी मेहता, संत मीराबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत सेवा न्हावी, संत नरहरी सोनार, संत द्न्यानेश्वर माऊली, श्री प्रल्हाद, श्री धृव, संत रामदास स्वामी, संत रोहिदास अहिल्या उद्धार (स्त्रीला), संत कान्होपात्रा, संत जिव्हजी महाराज अशाप्रकारे संतांचा समावेश असतो.

आश्विन शु. ८ सूर्याचे वाहन

सूर्याच्या रथाला सात घोडे (निरनिराळ्या रंगांचे) व सारथी अरुण (गरुडाचा भाऊ) भगवान सूर्यनारायण रामथध्ये उभे राहून त्यावर श्रींची स्थापना करतात.

आश्विन शु. ९ मारुती वाहन

सदरच्या वाहनावर मारुतीच्या ६ फूटी भव्य मूर्तीवर श्रींची स्थापना करण्यात येते. सदरचे वाहन २४-२५ फूट उंच असते. यावर कपिलसेना (वानरसेना) मार्ग : मंदिरातून १० ला निघून सकाळी ५-६ च्या सुमारास परत येते.

आश्विन शु. १० गरुडाचे वाहन

सदरच्या वाहनावर गरुडाची ६ फूटी भव्य मूर्तीवर श्रींची स्थापना करण्यात येते. सदरचे वाहन २४-२५ फूट उंच असते. या वाहनावर स्त्री राज्यातील स्त्रीयांनाच गाण्यासहीत साज सरंज्यामसहित स्त्रीयांचा समावेश घेतलेला आहे. सदरच्या सर्व स्त्रीया निरनिराळ्या वेश व केशभूषा केलेल्या आहेत. वरील सर्व स्त्रीया सुंदर, मोहक दिसतात.

आश्विन शु. ११ एकादशी रथ

सदरचा रथ हा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून भारतात नंबर २चा उंच असा भव्य रथ आहे. रथावर उत्तम प्रकारचे कोरीव काम असून सदरचे काम यावलकर मिस्त्री यांनी केलेले आहे. सदरचे काम इतके मन लावून केले आहे की, भगवान विष्णूचे दहा अवतार कोरुन बसविलेले आहेत. अशा सुशोभित रथावर दोन राक्षसांच्या भव्य मूर्त्या (आजूबाजूस) बसवण्यात येतात. पुढे दोन मोठे उत्तम प्रकारचे घोडे व त्यावर अर्जुन बसविण्यात येतो. अशा या रथात मध्यभागी सिंहासनावर ‘श्रीं’ची स्थापना करण्यात येते. रथाचा कळस, निशाण आणि ऊस लावून सुशोभित करण्यात येतो. रथाच्या चारही बाजूस केळींचे खांब व घड लावण्यात येतात.

सदरचा रथाची महापूजा दुपारी १२ वाजता वंशजाच्या हस्ते करण्यात येते. रथाच्या चाकाखाली भग म्हणून कोहोळ व श्रीफळ ठेवण्यात येते. सदरच्या रथास ४ मोठे लांब असे १०० ते २०० फूट दोर लावण्यात येतात. सदरचा दोर भाविक लोक श्रींच्या गर्जनाने आनंदाने ओढतात.

उदा.: १४ वर्षाच्या काळानंतर राम परत आले हे समजताच गावातले सर्व वाद्यवाले, तालिमवाले, निरनिराळ्या प्रकारचे सोंगवाले, अनंत स्त्री-पुरुष असे श्रीरामाला घेण्यासाठी धावत जातात व त्यांना आनंदाच्या जयघोषात वाजत-गाजत व वानरसेवा भूभूकार करीत नगरात आणतात. त्याचप्रमाणे ३६० दिवसांनी आज श्रींची मिरवणूक आहे म्हणून वाद्यवाले, लेझिमवाले, तुतारीवाले, भेरवाले, गुरव, तालिमवाले, आपल्या गाड्या सवारुन रथाच्यापुढे लावतात व आपली लाठी, काठी, भाले, तरवारी पट्टे यांचे खेळ करतात. देवीचे सोंगवाले वगैरे बरेच लोक आपापली वाद्ये घेऊन श्रींच्या रथापुढे वाजवित असतात आणि गावातील स्त्री-पुरुष श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. धक्का-बुक्की करीत असतात. घराला कुलपे लावून लोक दर्शनास येत असतात. जे आजारी असतात त्यांच्या जीवनाची चलबिचल होत असते. ‘देवा, मला तुझ्या दर्शनासाठी येता येत नाही रे ! किती मी अभागी ! साठ वर्षे सतत श्रींचे दर्शन घेऊन सुद्धा तो श्रींच्या दर्शनासाठी अंथरुणावर तळमळ करीत असतो. केवढे हे श्रद्धास्थान, श्रद्धेमध्ये अनुष्ठान, अनुष्ठानातच मानवता, मानवतेमध्ये प्रेम, प्रेमात त्याग, त्यागात शांती हीच शांती आत्म्याला शांती देते.

वैशिष्ठे : अनेक हमालांकडून मोगरीचे ने-आण होऊन रथ थांबविण्यास मोगरीचा उपयोग करतात. सदर मोगरा ओल्या चिंचेच्या झाडाच्या लाकडाचे तयार करतात. रथास साधारण ४०-४५ मोगरया लागतात. मिरवणूक संपल्यावर एकही मोगरी कामात येत नाही. मोगरी लावणारे हमाल या गावातील २/२ पहिलवान अगदी रथाच्या चाकामध्ये राहून बरोबर मोगरा लावतात. हे काम भिलाभाऊ साळी, भिमाभाऊ सोनार इ. कौशल्याने करतात. रथाचे चाक इतके अवाढ्व्य आहे की, माणूस सापडल्यावर मोगरीप्रमाणेच त्याचा चुरा होऊन जाईल; परंतु श्रींच्या कृपेने अजूनपर्यंत काहीच असा प्रकार झाला नाही. हा रथ ओढ्ण्यास साधारण २०० ते ३०० माणसे लागतात. पण गावातील व यात्रेस येणारे लोक, मोठ्या प्रेमाने रथ श्रींची गर्जना करत ओढत असतात.

आश्विन शु. १२ अंगद

सदरच्या वाहनावर अंगदाची भव्य मूर्ती (६ फूट उंचीची) असून सदरचे वाहन २४/२५ फूट उंच असून त्यावर छत्री असते. या अंगदावर श्रींची स्थापना होते. अंगद हा वालीपुत्र असून हा किश्किंधा देशाचा राजा होता. त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभु वनवासात गेले असताना सीता मुक्तीच्या कामी अंगदाने रावणाकडे शिष्टाई केलेली हा संदर्भ रामायणात आहे. सदरच्या वाहनावर लंकेतील देखावा आहे. दोन राक्षस डाव्या व उजव्या बाजूस रामपंचायत - श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता; शिवाय वानरसेना संपातीसह (जटायू काका) नळ वानरसहीत. सदरचे वाहन रात्री १० वाजता निघून दुसरया दिवशी सकाळी ११-१२ वाजता मंदिरात परत येतात.

वैशिष्ठे : परत आल्यावर पंचाआरती होते व कापूराच्या अनेक आरत्या होऊनसुद्धा श्रींची मूर्ती वाहनावरुन हलत नाही. यावेळेस पुजारी श्रींच्या मूर्तीस मोठ्या प्रेमाने हलवतो. कापूराची आरती ४० ते ५० संख्येने होऊन मूर्तीचे वजन कमी होऊन मग पुजारी श्रींना वाहनावरुन खाली उतरवितात. त्यावेळेस दर्शनाकरिता हजारो लोकांची गर्दी असते म्हणून पुजारी श्रींच्या मूर्तीस डोक्यावर धरुन फार मोठ्या प्रयत्नाने मंदिराच्या पायरीजवळ येतात. त्यावेळेस पुजारीसह मूर्तीस औक्षण करण्यात येते. नंतर मूर्ती मंदिरात सिहांसनावर विराजमान होते.

आश्विन शु. १३ इंद्रसभा

सदरच्या वाहनावर इंद्राची भव्य मूर्ती बसविण्यात येते. ५-६ हमाल लावून ती मूर्ती उचलतात. सदरचे वाहन २४-२५ फूट उंच असून त्यावर छत्री असते. त्यावर श्रींची स्थापना होते.

उजवे व डावे बाजूस काळ भैरव (यम), इंद्राच्या मांडीजवळ त्यांचे चिरंजीव जयंत यांची लहान सुंदर गोजरी मूर्ती, समोर गजाननाची मूर्ती, ब्रम्हा, विष्णू, महेश, चंद्र, सूर्य, अग्नी, पवन, वरुण, नारद, गायन करणारे तुंबर, २ चोपदार (जय, विजय), वशिष्ठ, विश्वामित्र, सुर्यसारथी अरुण, काळ भैरव प्रतिनिधी. पुढे उर्वशी, रंभेचा नाच, सारंगी तबल्यासह गंर्धव (गायक), कामधेनू ऎरावत, अस्या रत्ने व देवाधिकासहीत इंद्रसभा मोठ्या लाईटने सुशोभित करण्यात येते.

आश्विन शु. १५ पालखी

पालखी सकाळी निघून राम मंदिरात १० वाजेस राम मंदिरात पोहोचते. तिथे श्रींचे स्नान विहिरीत उतरुन सचैल स्नान होते. नंतर अभिषेक, महापूजा व आरती प्रसाद.

सदरचे पंधरा दिवस देव ओवळ्यात असतात. नंतर मंगळवार, शुक्रवार पाहून काढाचा कार्यक्रम करण्यात येतो. त्या दिवशी देव सोहळ्यात जातात.

कै. गिरधरशेठ यांची समाधी (छ्त्री)

श्री बालाजींच्या निस्सिम परमभक्त कै. गिरधरशेठ शिंपी ज्यांच्यासोबत श्रींचे आगमन पारोळ्यात झाले त्यांची समाधी राष्ट्रीय महामार्गावर गावालगत असून आपल्या भक्तास भेट्ण्यासाठी या उत्सव कार्यक्रमात मिती अश्विन शुद्ध सप्तमीच्या दिवशी सकाळी श्री बालाजी पालखीतून समाधीजवळ जातात. त्यावेळी श्रींच्या नेत्रातून अश्रू वाहतात अशी सत्य कथा आहे. त्या ठिकाणी पूजा अभिषेक होऊन परत श्रींची पालखी मंदिरात येते. मध्यंतरी या समाधीचा जिर्णोद्धार करण्यात येऊन हल्ली सुंदर अशी नक्षीकाम करुन समाधी बांधण्यात आली आहे.

हा संपूर्ण १५ दिवसांचा उत्सव साजरा करण्यासाठी संस्थानचे विश्वस्त तसेच उत्सव समितीचे सभासद अतिशय परिश्रम घेऊन त्यांना शहरातील सर्व शासकिय अधिकारी पदाधिकारी यांची साथ लाभते व सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी करण्यात येतो. असा हा श्री बालाजींच्या भव्य सोहळ्याचे वर्णन करण्याचा अधिकार श्री व्यास, श्री वसिष्ठ ॠषी, श्री विश्वामित्र, श्री नारद यानींच त्यांचे वर्णन करावे. मानवाचे ते काम नाही. तरी महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व देशातील भक्तांनी जळगाव जिल्ह्यातील प्रति तिरुपती पारोळा नगरीत नवरात्र उत्सवात आयुष्यातील एक दिवस अवश्य भेट देऊन श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.